दिवाळीनंतर एसीबीचा धुमधडाका, आठवडाभरात तीन लाचखोर पोलिस चतुर्भुज

Foto

औरंगाबाद शहरातील पोलिस लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा तीन घटना आठवडाभरात घडल्या आहेत. एका आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तीन लाचखोर पोलिसांना रंगेेहाथ पकडले आहेे. सहायक फौजदारापासून पोलिस शिपायापर्यंत तीन जण आठ दिवासांत एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. ताजी घटना वेदांतनगर येथे घडली असून हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस शिपायाला अटक करण्यात आली आहेे.

 

एक हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंत लाच घेताना अटक

आरोपीवर कठोर कारवाई न करण्यासाठी आरोपीच्या भावाकडून एक हजाराची लाच स्वीकारताना वेदांतनगर पोलिस ठाण्यातील योगेश पंडित सूर्यवंशी या शिपायाला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रंगेहात अटक केली. पोलिसांवरील एसीबीची ही आठवडाभरातील तिसरी कारवाई आहे.

 

काही दिवसांपूर्वीच २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातारा पोलिस ठाण्यात सहायक फौजदार कुऱ्हाडे यांना रंगेहात पकडण्यात आले होते. यानंतर एसीबीने दुसरी कारवाई सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वीच केली होती. आठवडाभरात दोन घटना घडल्यानंतर तिसरी कारवाई वेदांतनगर येथे झाली आहे. शुक्रवारी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली असून हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस शिपाई चतुर्भुज झाला आहे.

 

जामीन मिळवून देण्यासाठी मागितली लाच

तक्रारदाराच्या भावावर मारहाणीचा गुन्हा दाखल होता. त्याला जामीन मिळवून देण्यासाठी आणि कठोर कारवाई न करण्यासाठी आरोपी सुर्यवंशी याने साहेबांना चहापाणीकरावे लागले असे सांगून आरोपीच्या भावाकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यांनी याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. एसीबीच्या पथकाने प्रकरणाची सत्यता पडताळून सापळा रचून शुक्रवारी लाचखोर शिपाई सूर्यवंशीला रंगेहात अटक केली आहे.